– डाऊ फ्युचर देणार बाजाराला उभारी!
व्यापार हिंदुस्थान प्रतिनिधी
मुंबई
नवीन संवत्सर, सामवत सुरुवात आणि लक्ष्मीपूजन मुहूर्तावर सकारात्मक बंद झालेल्या बाजाराला आज डाऊ फ्युचरचे बळ मिळण्याच्या आशा आहेत. निफ्टी आणि सेन्सेक्स काहीसे निगेटिव्ह ट्रेंडमध्ये असले तरीही बँक निफ्टी, फिननिफ्टी आणि अन्य इंडायसेस सकारात्मक आहेत. त्यामुळे बाजाराच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
प्रकाशपर्वाच्या दीपावली उत्सवात देशभरात दमदार खरेदी-विक्री भारतीयांनी केली. ४ लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याने बाजारात आगळा उत्साह असतानाच लक्ष्मीपूजनाच्या ‘मुहूरत ट्रेडिंग’ दिवशी सर्व निर्देशांक सकारात्मक बंद झाले. तीच सकारात्मक घेऊन बाजार आठवड्याची चांगली सुरुवात करण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहे. याला अमेरिकन बाजाराचे पाठबळ किमान ओपनिंग सेशनमध्ये राहण्याची चिन्हे आहेत.
मागील आठवड्यात अमेरिकन डाऊ फ्यूचर २८८ पॉइंट्स अधिक बंद झाले. हे भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक चित्र आहे. यामुळे सोमवारी सुरुवातीला बाजार काही प्रमाणात ‘गॅप अप’ देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील इस्रायल-इराण युद्धजन्य स्थितीमुळे बाजारावर मागील दहा दिवसांपासून असलेला दबाव आठवडारंभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सुरुवातीच्या १५ मिनीटांनंतरच शेअर बाजाराची दिशा दिसू शकेल, असे शेअर बाजार सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान सोमवारच्या बाजारात मिड कॅप शेअर्ससह ऑटो, इंधनाशी निगडित कंपन्यांमध्ये खरेदी दिसण्याची शक्यता असेल. निफ्टी जोपर्यंत २४ हजार व बँक निफ्टी ५१ हजार अंकांच्यावर आहे, तोपर्यंत तो सकारात्मकच असेल. बीएसई सेनसेक्सला मात्र सकारात्मक स्थितीत येण्यासाठी ८० हजारांचा टप्पा पार करावा लागेल. मोठ्या गॅप अपने बाजाराची सुरुवात झाल्यास ते शक्य असेल, असे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हटले आहे.