व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रणी व प्रामुख्याने बोगदा खणन करण्यात मातब्बर आणि कुशल असलेल्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे लिस्टींग सोमवारी शेअर बाजारात सामान्य होण्याची शक्यता आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील शापूरजी पालनजी समुहाचा भाग असलेल्या या कंपनीने मागील आठवड्यात आपला आयपीओ आणला होता. त्यामध्ये एका शेअरची किंमत ४६३ रुपये होती. ३२ शेअर्सचा लॉट होता. त्यानुसार प्रति लॉट १४ हजार ८१६ रुपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य होते. त्यावर गुंतवणूकदारांना प्रति शेअर १५ रुपयांपर्यंत लिस्टींग गेन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यानुसार या कंपनीचे शेअर ४७६ ते ४८० रुपयांदरम्यान सोमवारी सकाळी १० वाजता शेअर बाजारात लिस्ट होण्याचे संकेत शेअर बाजार विश्लेषकांनी दिले आहेत.
ही कंपनी समृद्धी महामार्गावरील ‘एस’ आकारातील बोगद्यासह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीखालील महत्त्वाकांक्षी बोगद्याचे काम करीत आहे. तसेच चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूलदेखील कंपनीने उभा केला आहे.