HomeVyaparदिवाळीने देशाला दिला ४ लाख कोटींचा व्यापार
दिवाळीने देशाला दिला ४ लाख कोटींचा व्यापार
– देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
व्यापार हिंदुस्थान प्रतिनिधी
मुंबई
आपल्या समृद्ध संस्कृतीतील सर्वात मोठा उत्सव असलेल्या दिवाळीने या देशाला तब्बल ४ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांत दिव्यांच्या रोषणाईपासून ते नवीन कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फटाके या सर्वांचा समावेश असून ते स्वदेशी होते. चीनी वस्तूंच्या खरेदीला या देशातील राष्ट्रप्रेमी ग्राहकांनी दूर केले. यामुळे देशभरातील ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
धनत्रयोदशीनिमित्ताने देशभरात ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय सचिव शंकर ठक्कर यांनी सांगितले. महामुंबईतील हा आकडा ९० हजार कोटी रुपयांच्या घरात होता. त्यात सोने-चांदीसह वाहनखरेदी, इलेक्ट्रॉनिक्स सामान, कपडे, सजावटीच्या वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू यांचा समावेश होता.
दुसरीकडे सोन्याचा दर उच्चांक गाठत असतानादेखील ग्राहकांनी धनत्रयोदशीला आवर्जून सोने खरेदीचा मुहुर्त गाठला आहे. धनत्रयोदशीला खरेदी केली जाते व त्यातही सोने-चांदी किंवा धातू खरेदीला महत्त्व असते. त्यानिमित्ताने अपेक्षेपेक्षा जवळपास ४० टक्के खरेदी-विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
देशाच्या सोने-चांदी खरेदीचा हब असलेल्या झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांच्यानुसार, यंदा सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने वास्तवात खरेदी चांगली पण सामन्य असेल, असा अंदाज होता. संपूर्ण देशात ३५ ते ४० टन सोने उलाढालीची शक्यता असताना तब्बल ५५ टन सोने खरेदी झाले. मुंबईतील हा आकडादेखील मोठा होता. झवेरी बाजार सकाळपासून गर्दीने फुलला होता. रात्री उशीरापर्यंत ग्राहक होते. प्रारंभी केवळ लहान दागिन्यांची खरेदी होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र सोन्याच्या बिस्कीटांपासून ते कानातले डूल, अंगठ्या व मंगळसूत्राचीदेखील खरेदी झाली.
दर अधिक असल्याने आर्थिक राजधानी मुंबईत ७५० ते ८०० किलो सोने धनत्रयोदशीच्या निमित्ताने खरेदी होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज होता. प्रत्यक्षात १ हजार किलो खरेदी-विक्री झाली. अनेक ग्राहक कमी दरांवर खरेदी केलेले जुने सोने मोडून नवीन दागिने तयार करताना दिसले. मंगळवारी सोन्याचा दर ८२ हजार रुपये प्रति किलो होता. त्यानुसार ८५० कोटी रुपयांची उलाढाल मुंबईत झाली. दुसरीकडे चांदीनेदेखील १ लाख रुपये किलोचा टप्पा गाठला असताना त्याची उलाढालदेखील काही शेकडा कोटीत होती, असे व्यावसायिकांनी सांगितले.