आषाढ अमावस्येची धो-धो पावसातली रात्र, त्यात सह्याद्री अक्राळ-विक्राळ डोंगररांगा, या स्थितीत सिद्धी जौहरसारखा हिंदूद्वेष्टा शत्रू मागावर असताना पन्हाळगड ते पावनखिंड हा डोंगररांगा, दऱ्या-खोऱ्यांचा खडतर मार्ग, या स्थितीत रात्रभर अनवाणी पायी चालून दुसऱ्या दिवशी सलग सहा तास खिंड लढवत ठेवून स्वत:च्या देहाचा त्याग नरवीर बाजूप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवरायांसाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी दिला. पावनखिंडीत जाऊन त्या लढाईच्या स्मृतीस्थळाला वंदन करता येते. त्या ऐतिहासिक लढाईस्थळाकडे जाणारा मार्ग रोमहर्षक व तितकाच सह्याद्रीचे दूर्गम असे दर्शन घडविणारा आहे. कोल्हापूरमार्गे, पन्हाळा-मलकापूरमार्गे किंवा अंबामार्गे, या कुठल्याही दिशेने पावनखिंडीला येताना दोन ते तीन घाटमार्ग पार करावेच लागतात. त्यातूनच सह्याद्रीचे दर्शन घडते.