– ओबेरॉय रिअॅलिटीकडून ८१ एकर जागेची खरेदी
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
आर्थिक राजधानी मुंबईत आता आणखी विस्ताराला फारसा वाव नसताना व त्याचवेळी अटल सेतूसारखा इंजिनीअरिंग मार्वेलचा रस्ता उपलब्ध झाल्याने मुंबई ते नवी मुंबई व पुढे रायगड हे एकमेकांच्या जवळ आले आहेत. त्यामुळेच मोठमोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांची पावले आता रायगडच्या दिशेने वळली आहेत. त्यातच ओबेरॉय रिअॅलिटी या मातब्बर कंपनीने अलिबागच्या समुद्रकिनारी आलिशान हॉटेल, रिसॉर्ट व टाऊनशिपसाठी तब्बल ८१.०५ एकर जमीन खरेदी केली आहे.
माहितीनुसार, कंपनीने तेथील टेकळी या गावात या जमिनीची खरेदी केली आहे. प्रत्यक्ष सौदा हा ३ लाख २८ हजार ०१० चौरस मीटरसाठी झाला आहे. ८१.०५ एअरपैकी ८.६० एकर जमिनीवर पंचतारांकित म्हणजेच फाइव्ह स्टार हॉटेल आणि रिसॉर्ट उभे केले जाणार आहे. त्यासाठी ३० हजार चौरस मीटरच्या चटई क्षेत्र निर्देशांचा म्हणजेच एफएसआयचा वापर होणार आहे. तर उर्वरित ७२.४५ एकर जमिनीवर आलिशान विला असलेले निवासी संकूल उभे केले जाणार आहे. त्यासाठी १.२० लाख एफएसआयचा वापर होईल. त्यातच जमीन मालकांना काही विला देण्यात येणार असून भागीदारीतून हे निवसी संकूल उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.