HomeBusiness#ProtectedByPOCSO : मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी ‘अर्पण’ पुढाकार
#ProtectedByPOCSO : मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी ‘अर्पण’ पुढाकार
एमएमआरडीएसह महत्त्वाकांक्षी जनजागृती मोहीम सुरू
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
बाल लैंगिक शोषण हा चिंतेचा विषय झाला असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीडब्ल्यू) आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी कार्यरत असलेली देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था, ‘अर्पण’ ने, बाल लैंगिक शोषणकर्त्यांना उद्देशून मोठ्या प्रमाणावर एक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. #ProtectedByPOCSO ही अर्पणची मोहीम, ‘बाल लैंगिक शोषण हा एक शिक्षापात्र गुन्हा असून आत्ताच थांबा नाहीतर पकडले जाल’, एक सशक्त आणि स्पष्ट संदेश देते.
बाल लैंगिक शोषणाच्या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी ‘अर्पण’ ची मागणी असून शोषणकर्त्यांनी लैंगिक शोषण थांबवले नाही, तर त्यांना पॉक्सो कायद्याअंतर्गत (लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम, २०१२) कठोर शिक्षा होऊ शकते आणि विविध सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी सक्त ताकीद #ProtectedByPOCSO या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून शोषणकर्त्यांना दिली जाणार आहे. याशिवाय बाल लैंगिक शोषणात कोणकोणती कृत्यं येतात, याविषयी सर्वसामान्यांना शिक्षितदेखील करणार आहोत. परंतु हे शिकवत असताना, बाल लैंगिक शोषण कधीच स्वीकारले आणि सहन केले जाऊ शकत नाही, हे आम्ही त्यांना ठासून सांगणार आहोत. बाल लैंगिक शोषणविषयक कायदे आणि संरक्षणात्मक यंत्रणेविषयी व्यापक जनजागृती करून अर्पणला बाल लैंगिक शोषणकर्त्यांना अशा प्रकारचे गुन्हे करण्यापासून रोखायचे आहे आणि अशा कृत्यांबद्दल त्यांना जबाबदार धरले जाईल याची जाणीव करून द्यायची आहे.
मुंबई मेट्रोच्या २ अ व ७ या मार्गिकांवर बाल सुरक्षेचे संदेश लावून, या मोहिमेचा उद्घाटन समारंभ महामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल आणि अर्पणच्या संस्थापिका तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया यांच्या उपस्थितीत गुंदवली मेट्रो स्टेशन येथे पार पडला.
हा कार्यक्रम म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात असून, यामुळे ही मोहीम एमएमएमओसीडब्ल्यूच्या २अ आणि ७ या मार्गिंकावरून रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे,. बाल सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर प्रवाशांशी संवाद साधला जाणार आहे आणि बाल लैंगिक शोषणाच्या अपराध्यांना मुलांना आपले भक्ष्य बनवण्यापासून रोखले जाणार आहे.
या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकांवर या मोहिमेची प्रसिद्धी केली जाणार असून, त्यामध्ये आरे, गुंदवली, लोवर ओशिवारा, अंधेरी पश्चिम, कांदिवली, बोरिवली, मागठाणे, जोगेश्वरी, डहाणूकरवाडी आणि दहीसर अशा काही महत्त्वपूर्ण स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर जागोजागी लावलेले बॅनर्स आणि तिकिट विक्री केंद्रांजवळ उभ्या केलेल्या स्टॅंडीजमधून या मोहिमेचे संदेश सर्वदूर पसरतील आणि या विषयावर व्यापक समाजप्रबोधन करतील यात शंका नाही.
‘एमएमआरडीएसोबत काम केल्याने आम्हाला मुलांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करायला मदत होईल. या संयुक्त उपक्रमातून #ProtectedByPOCSO ही मोहीम लाखो प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे. यातून बाल लैंगिक शोषणकर्त्यांपर्यंत हा स्पष्ट संदेश जाणार आहे की, आता समाज आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी एकजूट झाला असून, शोषणकर्त्यांवर सर्वांचं बारीक लक्ष असणार आहे. तसेच या निंदनीय गुन्ह्याबद्दल त्यांना पॉक्सो कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा होऊ शकते असा निर्वाणीचा इशारा त्यांना या मोहिमेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
पूजा तापडिया
संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्पण
अर्पणच्या असे लक्षात आले आहे की, मुलांकडून नोंदवण्यात आलेले २५ टक्के असुरक्षित प्रसंग हे सार्वजनिक ठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे सर्व सार्वजनिक जागा आता मुलांच्या दृष्टीने सुरक्षित बनवण्याची वेळ आलेली आहे. यासाठी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी आणि आणि एमएमएमओसीडब्ल्यूच्या रुबल अग्रवाल यांचे ‘अर्पण’ ने मनापासून आभार मानले ओहत. कारण त्यांच्या अमूल्य सहकार्यामुळे ही मोहीम मुंबईच्या मेट्रो ट्रेनमध्ये राबवता येणार आहे, असे तापडिया यांचे म्हणणे आहे.
बाल सुरक्षा सप्ताहादरम्यान (१४ ते २० नोव्हेंबर) आम्ही #ProtectedByPOCSO या मोहिमेचा शुभारंभ केला असून यानिमित्ताने बाल सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबई आणि ठाण्याच्या बसेसमध्ये मुलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याचा संदेश दिला जात आहे. विले पार्ले आणि वांद्रे येथील बिलबोर्ड्स, महा मुंबई मेट्रो, ठाणे महापालिकेच्या आणि बेस्ट बसेस, पश्चिम मार्गिकेवरील लोकल ट्रेन्स आणि मुंबईच्या विविध भागांमधील ऑटोरिक्षा यांच्या मदतीने या मोहिमेला दमदार प्रसिद्धी मिळत आहे. तसेच विविध शाळांमध्ये शाळकरी मुलांच्या गणवेशावर #ProtectedByPOCSO हा संदेश लिहिलेल्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मुंबईची विविध पीव्हीआर थिएटर्स आणि Jio Cinema, Zee5 and MX Player सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सवर याविषयावरील एक छोटीशी फिल्म दाखवून या मोहिमेबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.
या मोहिमेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि पॉक्सो कायद्याचे तपशील जाणून घेण्यासाठी www.arpan.org.in ला भेट द्या किंवा सोशल मीडियावर #ProtectedByPOCSO ला फॉलो करा. चला तर सर्वांनी एकत्र येऊन भारताच्या प्रत्येक मुलासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करूया.